
नागरिकांना मोठा दिलासा
जळगाव : शहरातील खराब रस्ते व खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. महापालिका हद्दीतील, महापालिकेने विकसित केलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एखादी व्यक्ती जखमी झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास, संबंधित नागरिक किंवा त्यांच्या नातेवाइकांना **जळगाव महानगरपालिका**कडून आर्थिक मोबदला (नुकसानभरपाई) दिला जाणार आहे. यासाठी आवश्यक पुराव्यांसह माहिती सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवरील सुनावणीत दिलेल्या आदेशानुसार हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नुकसानभरपाईसाठी अर्ज महापालिकेच्या नवव्या मजल्यावर शहर अभियंता कार्यालयात, सर्व आवश्यक पुराव्यांसह सादर करावा लागणार आहे. या निर्णयामुळे रस्ते देखभालीबाबत महापालिकेची जबाबदारी अधिक वाढली असून, अपघातातील जखमी नागरिक तसेच मृतांच्या कुटुंबीयांना कायदेशीर आधार मिळाला आहे.
नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांची छाननी करण्यासाठी विशेष समिती गठित करण्यात आली आहे. समिती अर्ज व पुराव्यांची सखोल पडताळणी करेल. त्यानंतर पात्र ठरलेल्या व्यक्तींना किंवा त्यांच्या वारसांना नुकसानभरपाईची रक्कम अदा करण्यात येईल. खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांत नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने ही प्रक्रिया राबवली जात आहे. पात्र नागरिकांनी आवश्यक पुराव्यांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांनी केले आहे.


