
जळगाव हादरले: जीवे मारण्याची धमकी !
जळगाव प्रतिनिधी – जळगावच्या वैद्यकीय क्षेत्रातून एक अत्यंत लज्जास्पद प्रकार समोर आला असून, शहरातील मध्यवर्ती भागातील ‘हार्ट प्लस’ रुग्णालयात एका ३० वर्षीय परिचारिकेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी डॉ. संदीप भारुडे आणि त्यांच्या पत्नी डॉ. प्रीती भारुडे यांच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, गेल्या सहा महिन्यांपासून, म्हणजेच २१ जुलै २०२५ पासून डॉ. संदीप भारुडे हे संबंधित पीडितेला अश्लील चाळे करून त्रास देत होते. वारंवार पाठलाग करणे आणि कामाच्या ठिकाणी बळजबरीने जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे, अशा तक्रारी पीडितेने दिल्या आहेत.
धक्कादायक म्हणजे, जेव्हा पीडितेने या त्रासाला विरोध केला, तेव्हा डॉ. प्रीती भारुडे यांनी तिला मदतीऐवजी उलट धमकावले. “जर ही वाच्यता केली, तर तुझ्या पतीला व मुलांना औषधातून विष देऊन संपवू,” अशी धमकी देण्यात आली. अखेर त्रासाची परिसिमा गाठल्याने पीडितेने पोलिसांत धाव घेतली. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


