चाळीसगाव प्रतिनिधी | नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्याने अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणारे सक्रिय होण्याची शक्यता लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलिसांकडून अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मेहुणबारे पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे १४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
२९ ऑक्टोबर रोजी मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत कळमडू गावातील कुंभार रोडलगत आरोपी महेश दिनकर सूर्यवंशी हा अवैधरीत्या वाळूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खात्री करून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी आरोपी महेश सूर्यवंशी हा शासनाच्या मालकीची गौण खनिज वाळू कोणताही वैध परवाना अथवा परवानगी नसताना डंपरमध्ये भरून चोरी करून वाहतूक करताना आढळून आला.
पोलिसांनी कारवाई करत टाटा सिग्मा डंपर (क्रमांक MH-04-ZE-1322) किंमत १४ लाख रुपये आणि एक ब्रास शासकीय गौण खनिज वाळू किंमत ६ हजार रुपये, असा एकूण १४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे.



