चाळीसगाव प्रतिनिधी | तालुक्यातील वाघळी येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये ५५ वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ करून बेदम मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे तर लोखंडी पावडीने डोक्यावर वार करून जखमी करण्यात आले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाऊसाहेब गणपत बेढर (वय ५५, रा. वाघळी, ता. चाळीसगाव) असे जखमी फिर्यादीचे नाव आहे. गावातील दिलीप भास्कर बेढर आणि विलास भास्कर बेढर या दोघांमध्ये बोलताना एका व्यक्तीला उद्देशून ‘तू या भिकारड्याकडे का गेला होता?’ असे म्हटले गेले. यावर भाऊसाहेब बेढर यांनी ‘तू भिकारड्या कोणाला बोलला?’ असा जाब विचारला.
याच गोष्टीचा राग मनात धरून दिलीप आणि विलास या दोघांनी भाऊसाहेब यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी रस्त्याच्या बाजूला पडलेली लोखंडी पावडी उचलून त्यांच्या डोक्यात मारण्यात आली. या हल्ल्यात भाऊसाहेब जखमी झाले.
त्यानंतर संशयितांनी ‘आमच्या नादी लागला तर तुला सोडणार नाही’, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेनंतर भाऊसाहेब बेढर यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार दिलीप भास्कर बेढर आणि विलास भास्कर बेढर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.



