भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ शहरात कार्यरत असलेल्या विविध कंपन्यांच्या टू-व्हीलर (दुचाकी) शोरुम्समध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांनी तात्काळ तपासणीचे आदेश जारी केले आहेत. मोटार वाहन कायदा १९८८ तसेच त्याअंतर्गत लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शोरुम्सवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, यामुळे भुसावळ तालुक्यातील विनापरवाना व नियमबाह्य सुरू असलेल्या दुचाकी शोरुम चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांनी काढलेल्या आदेशानुसार भुसावळ शहरातील सर्व दुचाकी शोरुम्सची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत शोरुम्सकडे असलेली आवश्यक परवाने, अधिकृत नोंदणी, विक्री प्रक्रिया, वाहन नोंदणी संदर्भातील नियम, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्रे, विमा प्रक्रिया तसेच इतर अनिवार्य कागदपत्रांची बारकाईने छाननी केली जाणार आहे.
दोषी आढळल्यास तात्काळ कारवाई !
तपासणीदरम्यान मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणारे शोरुम्स आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ दंडात्मक कारवाई, परवाना रद्द करणे, शोरुम सील करणे यासारखी कठोर पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या तपासणीचा सविस्तर अहवाल न चुकता कार्यालयात सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.हे आदेश सचिन बुरुड, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांनी जारी केले असून, त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रभारी अधिकारी तथा मोटार वाहन निरीक्षक, वायुवेग पथक क्र. ०२ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर आरटीओची कारवाई !
या आदेशामागे एक संदर्भित निवेदन असून, त्यामध्ये भुसावळ शहरातील काही दुचाकी शोरुम्समध्ये आवश्यक कागदपत्रांची कमतरता असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. तसेच वेळेत तपासणी न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आरटीओ जळगाव यांनी तातडीने कारवाईचे पाऊल उचलले आहे.
नियमबाह्य व्यवसायाला आळा बसणार !
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरुड यांच्या नेतृत्वाखाली जळगाव आरटीओ कार्यालयाकडून वाहन नोंदणी, परवाने, आकर्षक क्रमांक, खाजगी वाहनांवरील गैरशासकीय पाट्या तसेच इतर नियमबाह्य बाबींवर सातत्याने कारवाई केली जात आहे. भुसावळमधील या विशेष तपासणी मोहिमेमुळे नियमांचे पालन न करणाऱ्या दुचाकी शोरुम्सना लगाम बसणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ग्राहकांसाठी आवाहन !
दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी केवळ अधिकृत व कायदेशीर शोरुम्सकडूनच वाहने खरेदी करावीत, जेणेकरून वाहन नोंदणी, विमा व आरटीओ प्रक्रिया सुरळीत आणि अडचणविरहित पार पडतील, असे आवाहन आरटीओ अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.