
उत्पादन घट व अवकाळी पावसाचा परिणाम; दैनंदिन आहारावर दरवाढीची झळ
जळगाव प्रतिनिधी : डिसेंबर महिन्यात १२० रुपये किलो असलेले शेंगदाण्याचे दर जानेवारी अखेर थेट १८० रुपये किलोपर्यंत पोहोचले असून, अवघ्या महिनाभरात तब्बल ६० रुपयांची दरवाढ झाली आहे. बाजारात नवीन शेंगदाण्याची आवक सुरू असली तरी यंदा अपेक्षेपेक्षा उत्पादन व आवक दोन्ही कमी असल्याने दर वाढल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
शेंगदाणा हा स्वयंपाकघरातील अत्यावश्यक घटक मानला जातो. भाजीपाला, उसळ, चटणी, पोहे, फराळ तसेच तेलासाठी मोठ्या प्रमाणावर शेंगदाण्याचा वापर होतो. विशेषतः ग्रामीण भागात आणि मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये प्रथिनांचा स्वस्त व महत्त्वाचा स्रोत म्हणून शेंगदाण्याला मोठे स्थान आहे. त्यामुळे झालेल्या दरवाढीचा थेट परिणाम दैनंदिन आहारावर होत असून, गृहिणींच्या बजेटवरही त्याचा ताण वाढला आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, यंदा पावसाचे प्रमाण असमतोल राहिले असून लागवड क्षेत्रातही घट झाली आहे. त्यातच गेल्या हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेंगदाण्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी उत्पादन घटले आणि त्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे.
जळगाव शहरात गुजरातसह इतर तीन राज्यांतून शेंगदाण्याची आवक होते. मात्र यंदा बाहेरून येणारा मालही मर्यादित असल्याने बाजारात तुटवडा जाणवत आहे. “अवकाळी पावसामुळे माल खराब झाला असून, उत्पादन कमी झाल्याने दर वाढले आहेत,” अशी माहिती जळगाव येथील व्यापारी चंद्रशेखर जोशी यांनी दिली. दरवाढीमुळे शेंगदाण्याच्या खरेदीकडे ग्राहकही सध्या जपून पाहत असल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे.


