
भुसावळ रेल्वे स्थानकाचा कायापालट,फलाट क्रमांक ७ व ८ ला आधुनिक ‘हायटेक’ रूप;
भुसावळ प्रतिनिधी : मध्य रेल्वेच्या भुसावळ रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसुविधा वाढविण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामांना वेग आला असून, त्याचाच भाग म्हणून फलाट क्रमांक ७ व ८ चे रूपडे पूर्णतः बदलण्यात आले आहे. अत्याधुनिक पद्धतीने करण्यात आलेल्या सौंदर्यीकरणामुळे हे फलाट आता स्वच्छ, सुशोभित व ‘हायटेक’ स्वरूपात दिसत असून, प्रवाशांकडून या बदलाचे कौतुक होत आहे.
फलाट परिसरातील रेल्वे रुळ, पाणी भरण्यासाठी असलेले लोखंडी पाईप्स तसेच इतर संरचनांना आकर्षक रंगसंगतीत रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वी दुर्लक्षित व साधा भासणारा परिसर आता टवटवीत, स्वच्छ व देखणा दिसू लागला आहे. या बदलामुळे केवळ स्थानकाच्या सौंदर्यात भर पडली नसून, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही सकारात्मक परिणाम होत आहे.
स्थानकावरील नेमप्लेटला चौरंगी रंगसंगती देत मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषांत नाव प्रदर्शित करण्यात आले आहे. यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना स्थानक ओळखणे अधिक सुलभ झाले आहे. तसेच मुख्य प्रवेशद्वारासमोर अत्याधुनिक डिजिटल वेळापत्रक फलक बसविण्यात आला असून, त्यावर गाड्यांची आगमन-प्रस्थान वेळ व सद्यस्थिती स्पष्टपणे दर्शविली जात आहे. परिणामी प्रवाशांचा वेळ वाचत असून संभ्रम कमी झाला आहे.
विशेष म्हणजे, स्टेशनमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच पार्किंग परिसरासमोर प्रथमच डिजिटल माहिती फलक उभारण्यात आला आहे. या फलकामुळे प्रवाशांना आत न जाता गाड्यांची स्थिती कळत असून, स्थानकातील गर्दी व गोंधळ कमी होण्यास मदत होत आहे. भुसावळ रेल्वे स्थानकाचा हा कायापालट प्रवाशांसाठी अधिक सुविधाजनक व आधुनिक अनुभव देणारा ठरत आहे.


