
भुसावळ पालिकेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने वाद विवादान विषय मंजूर
भुसावळ : नगरपालिकेत सत्तांतरण झाल्यानंतर भुसावळ नगरपालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा मंगळवार, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता पालिकेच्या वरच्या मजल्यावरील सभागृहात पार पडली. सुरुवातीला खेळीमेळीच्या वातावरणात सुरू झालेल्या या सभेत ‘लाडका नगरसेवक योजना’ सुरू केल्याचा आरोप झाल्यानंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये तीव्र शब्दयुद्ध झाले. अखेरीस सत्ताधाऱ्यांनी अजेंड्यावरील तब्बल २५० विषयांना मंजुरी दिल्याची घोषणा केली. सभेच्या अजेंड्यातील २५० पैकी शंभरहून अधिक विषयांना भाजपा विरोधकांनी विरोध दर्शविला. या संदर्भात नगराध्यक्षांना लेखी विरोधपत्रही सादर करण्यात आले. विशेषतः विषय क्रमांक २८ ते ६९ हे सर्व विषय एकाच प्रभाग क्रमांक दोनशी संबंधित असल्याने भाजपा गटनेते युवराज लोणारी यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत ‘लाडका नगरसेवक योजना’ सुरू केली आहे का? असा थेट सवाल उपस्थित केला. यानंतर सभागृहात वातावरण तापले व सत्ताधारी–विरोधकांमध्ये ‘तू तू, मैं मैं’ सुरू झाली. वाद निर्माण झाल्याने गदारोळ झाला यातच विषय मंजूरी सुरू होती .
सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे होत्या. यावेळी उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे, सत्ताधारी गटनेते सचिन चौधरी, मुख्याधिकारी विवेक धांडे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यालय अधीक्षक डॉ. अजित भट यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषयांचे वाचन केले.
४० मिनिटांत सभा आटोपली
सत्तांतरणानंतरची पहिलीच सभा असल्याने सभागृह परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी ११.२१ वाजता सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. विषय क्रमांक १ ते ५ ला सर्वानुमते मंजुरी मिळाली. मात्र विषय क्रमांक ३, ५, १०, १८ व २७ वाचले जात असतानाच भाजपा नगरसेवकांनी त्यांना विरोध करत ते विषय नामंजूर असल्याचे जाहीर केले. प्रभाग क्रमांक दोनमधील विषयांची संख्या अधिक असल्याने गटनेते लोणारी यांनी आक्षेप घेतल्यानंतर वाद आणखी तीव्र झाला.
गटनेत्यांकडे विषय द्या, आम्ही मंजुरी देऊ : संतोष चौधरी
सभेत गदारोळ सुरू असताना स्वीकृत नगरसेवक व माजी आमदार संतोष चौधरी यांनी हस्तक्षेप करत, शहराचा सर्वांगीण विकास करायचा असल्यास आगामी सभेपूर्वी आपापल्या गटनेत्यांकडे विषय द्यावेत, आम्ही ते मंजूर करू, असे स्पष्ट केले. तसेच शहरातील चायना लाईट काढून दर्जेदार पथदिवे बसवावेत, अशा सूचना त्यांनी बंद पथदिव्यांच्या समस्येवर दिल्या.
आयत्या वेळच्या विषयांना विरोध कायम : लोणारी
गटनेते युवराज लोणारी यांनी भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, चांगल्या व जनहिताच्या विषयांना भाजपा पाठिंबा देत आहे व पुढेही देईल. मात्र आयत्या वेळच्या किंवा चुकीच्या विषयांना विरोध राहील. अशा विषयांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलातील ई-ऑक्शन प्रक्रियेला त्यांनी तीव्र विरोध दर्शविला. २००८ मध्ये ५७ व्यापाऱ्यांना दुकाने देण्याची सूचना असून, त्यांनाच प्राधान्याने दुकाने मिळावीत, अशी मागणी त्यांनी यावेळी मांडली.पहिल्याच सर्वसाधारण सभेत झालेल्या या गदारोळामुळे पालिकेतील आगामी कारभार विकास आणि राजकीय समीकरणांकडे शहरवासीयांचे लक्ष वेधले गेले आहे.


