
नागरिकांचा सवाल : जळगाव शहरात समस्यांचा डोंगर
जळगाव : महानगरपालिका निवडणूक होवून महायुतीने सत्तेचा सोपान देखील गाठला आहे. महापौर, उपमहापौरांची निवड झाली असून प्रशासकीय राजवट संपुष्टात येसून राजकीय कार्यकिर्द सुरु झाली आहे. निवडणूक काळात जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तत: कधी व कशी होते याची जळगावकर आतुरतेने वाट पहात आहेत. शहरातील अनेक प्रभागात समस्यांचा डोंगर कायम असून समस्या सोडविण्यासाठी कारभारी केव्हा कामाला लागणार याचीच चर्चा रंगत आहे.
अनेक प्रभागात मुलभूत समस्यांचे निराकरण करतांना मनपाने हात आखडता घेतला आहे. मनपा क्षेत्रातील बहुतांश व्यापारी संकुल, मार्केट, हमरस्ते अतिक्रमण, घाणीचे साम्राज्य याने त्रस्त असून गटारींची अवस्था अतिशय वार्इट झालेली आहे. रस्त्यांची दुरावस्था वाहनचालकांच्या जीवावर उठली असून या समस्या सोडविण्यासाठी पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे.
जळगाव महानगरपालिकेची निवडणूक पार पडून महायुतीने सत्तेची सूत्रे हातात घेतली आहेत. महापौर, उपमहापौरांची निवड झाली, प्रशासकीय राजवट संपली आणि राजकीय कारभाराला अधिकृत सुरुवात झाली. कागदोपत्री पाहता शहराच्या विकासाचा नवा अध्याय सुरू व्हायला हवा होता. मात्र प्रत्यक्षात जळगावकरांचे रोजचे जगणे पाहिले, तर कारभारी केव्हा कामाला लागणार? हाच प्रश्न प्रत्येक प्रभागात, प्रत्येक चौकात आणि प्रत्येक गल्लीबोळात ऐकू येत आहे. निवडणूक काळात सत्ताधाऱ्यांनी विकासाची मोठी स्वप्ने दाखवली होती. स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक, अतिक्रमणमुक्त शहर, आधुनिक सुविधा अशा अनेक आश्वासनांचा पाऊस पडला. परंतु निवडणुकीला काही महिने उलटूनही शहरातील वास्तव बदललेले दिसत नाही. उलट अनेक प्रभागात समस्यांचा डोंगर अधिकच उंचावत चालल्याचे चित्र आहे.
शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये मुलभूत सुविधांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. अनेक ठिकाणी रस्ते अक्षरशः जीवघेणे झाले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे हाल होत असून अपघातांचे प्रमाण वाढत आहे. दुचाकीस्वार, रिक्षाचालक, खासगी वाहनधारक यांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. काही ठिकाणी तर पावसाळ्यात खड्डे आणि पाणी साचल्यामुळे रस्ता आहे की नाला, हेच ओळखू येत नाही. स्वच्छतेच्या बाबतीतही शहराची स्थिती फारशी समाधानकारक नाही. अनेक प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढीग रस्त्याच्या कडेला साचलेले दिसतात. बाजारपेठा, व्यापारी संकुले, सार्वजनिक ठिकाणे येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कचरा संकलन अनियमित असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात आहेत. दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे वाढणाऱ्या आजारांचा धोका यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
सांडपाणी रस्त्यावर!
गटारींची अवस्था तर आणखी गंभीर आहे. अनेक ठिकाणी गटारी तुंबलेल्या असून सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. काही प्रभागांमध्ये महिनोन्महिने गटारी साफ न केल्याने नागरिकांच्या घरासमोरच दुर्गंधीयुक्त पाणी साचते. पावसाळा जवळ आला की या समस्येचे स्वरूप अधिकच भयावह होते. तरीही मनपाकडून तातडीची दखल घेतली जात नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
अतिक्रमणाची झाली डोकेदुखी
अतिक्रमण हा जळगाव शहराचा जुना आणि कायमस्वरूपी प्रश्न आहे. मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठा येथे हातगाड्या, दुकाने, अनधिकृत बांधकामे यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी कारवाई झालीच, तर ती केवळ दिखाऊ आणि काही दिवसांची ठरते. पुन्हा काही दिवसांत परिस्थिती जैसे थे होते. अतिक्रमणधारकांवर कारवाई करताना मनपा हात आखडता का घेत आहे? असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.
नागरिकांमध्ये नाराजी वाढली
प्रभागनिहाय समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचेही बोलले जात आहे. नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेणे, त्यावर त्वरित उपाययोजना करणे, कामांची कालमर्यादा ठरवणे आणि जबाबदारी निश्चित करणे, या बाबींचा अभाव जाणवत आहे. परिणामी नागरिकांमध्ये नाराजी वाढत चालली आहे. निवडणूक जिंकली म्हणजे काम संपले नाही, तर तेथूनच खरी जबाबदारी सुरू होते, असे मत अनेक सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत. शहराचा विकास फक्त फलकांवर आणि भाषणांपुरता मर्यादित न राहता तो रस्त्यावर, गल्ल्यांत आणि नागरिकांच्या रोजच्या आयुष्यात दिसायला हवा, अशी अपेक्षा आहे.


