
सोलर वीज मीटर ग्राहकांना नियमित वीज बिल द्या! ग्राहक पंचायत महाराष्ट्रची ठाम मागणी
चंद्रपूर, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा भद्रावती, जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने दि. ०९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, भद्रावती कार्यालयास निवेदन देऊन सोलर वीज मीटरधारक ग्राहकांना नियमित व वेळेवर वीज बिल वितरित करण्याची मागणी करण्यात आली.
या प्रसंगी भद्रावती शहरातील गौतम नगर परिसरातील सोलर वीज मीटर ग्राहकांना ऑगस्ट २०२५ पासून वीज बिल मिळाले नसल्याच्या तक्रारी ग्राहक पंचायतकडे प्राप्त झाल्या होत्या. दीर्घकाळ बिल न मिळाल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम व आर्थिक ताण निर्माण होत असल्याची बाब संघटनेने निदर्शनास आणून दिली.
या पार्श्वभूमीवर ग्राहक पंचायतने उपकार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात सप्टेंबर २०२५ पासूनची सर्व थकित वीज बिले तातडीने वितरित करावीत, पुढील काळात कोणत्याही महिन्यात बिल वितरणात खंड पडू नये यासाठी आवश्यक ती प्रशासनिक खबरदारी घ्यावी, तसेच बिल वितरणाच्या कामात कसूर करणाऱ्या संबंधित खाजगी कंपनीवर योग्य कारवाई करावी, अशी स्पष्ट मागणी केली आहे.
तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सोलर मीटरधारक ग्राहकांना वेळेवर बिल न मिळाल्यास भविष्यात मोठ्या रकमेचे एकरकमी बिल येण्याची शक्यता असते, त्यामुळे तातडीने योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.
यावेळी शाखा अध्यक्ष प्रवीण चिमूरकर, उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश हटवार, कोषाध्यक्ष भारत खोब्रागडे, सहसचिव करूना मोघे, संघटक सोनल वावरे, सदस्य विनोद ठमके व प्रतिक्षा बनकर उपस्थित होते. दरम्यान, संबंधित विभागाने तक्रारींची दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


