
जळगाव महापालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय
जळगाव । जळगाव महापालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीची दखल घेत महापालिकेने मर्यादित कालावधीसाठी ‘अभय योजना’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत ५ ते १९ मार्च या कालावधीत थकबाकीदारांना मालमत्ता करावरील शास्ती (दंड) माफ करून घेण्याची संधी मिळणार आहे.
महापौर दीपमाला काळे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या योजनेमुळे नागरिकांना थकीत मालमत्ता कर भरताना दंडाची रक्कम भरण्याची गरज राहणार नाही. नागरिकांनी केवळ मूळ कर भरून आपली थकबाकी पूर्णपणे निकाली काढता येणार आहे. या निर्णयामुळे महानगरपालिकेच्या उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होईल.
या योजनेअंतर्गत नागरिकांनी दिलेल्या कालावधीत कर भरल्यास संपूर्ण शास्ती माफ करण्यात येणार आहे. महानगरपालिकेने कर भरणा प्रक्रिया सुलभ करण्यासाठी विविध डिजिटल पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यात क्यूआर कोड स्कॅनिंग, नेट बँकिंग, डेबिट व क्रेडिट कार्ड, तसेच UPI ॲप्स जसे फोनपे, गुगल पे आदींचा समावेश आहे. नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीनेही कर भरणा करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या दृष्टीने ही योजना महसूल वाढीसाठी महत्त्वाची ठरणार असून शहराच्या विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध होण्यास मदत होईल. थकबाकीचा बोजा कमी करण्याची आणि शहर विकासात आपला सहभाग नोंदविण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे महापौरांनी नमूद केले. नागरिकांनी १५ दिवसांच्या या विशेष कालावधीत पुढाकार घेऊन आपली थकबाकी नियमित करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कर वेळेत भरल्यास भविष्यातील दंड आणि अडचणी टाळता येतील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


