
याविरोधात लवकरच मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती संतोष सोनवणे यांनी दिली आहे.
भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राने वीज निर्मितीत नवनवीन विक्रम प्रस्थापित केले असले तरी प्रदूषण नियंत्रणाकडे मात्र पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. केंद्रातील 210 मेगावॅट, 2×500 मेगावॅट आणि 1×660 मेगावॅट असे तीनही प्रकल्प सध्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. मात्र, कोळशापासून निर्माण होणारी राख योग्य पद्धतीने व्यवस्थापित न करता पाईपलाईनद्वारे वेल्हाळे परिसरातील राख साठवण बंधाऱ्यात सोडली जाते.
या राखेची पाईपलाईन वारंवार फुटणे तसेच राख साठवण बंधाऱ्यातून निचऱ्याच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणावर राख बाहेर पडून भवानी नदीमार्गे वेल्हाळे तलावात मिसळत असल्याने गंभीर जलप्रदूषण निर्माण झाले आहे.वेल्हाळे तलावावर 1967 पासून कार्यरत असलेल्या ‘आदी जनता मच्छीमार सहकारी सोसायटी’मार्फत मत्स्य संवर्धन केले जाते. मात्र, 2009 पासून वाढलेल्या प्रदूषणामुळे तलावातील मासे मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडत असून संस्थेला मोठा आर्थिक फटका बसत आहे. याबाबत अनेक वेळा निवेदने व आंदोलने करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
चालू वर्षात संस्थेमार्फत तलावात सुमारे 5 लाख मत्स्यबीज सोडण्यात आले असून 300 टन उत्पादनाची अपेक्षा आहे. मात्र प्रदूषणामुळे हे उत्पादन केवळ 10 ते 20 टनांपर्यंत घसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, औष्णिक विद्युत केंद्राकडून राख विक्रीतून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळत असल्याने या निधीचा काही भाग वेल्हाळे परिसरातील नद्या-नाल्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि स्थानिक विकासासाठी वापरण्यात यावा, अशी मागणी मच्छीमार संस्थेकडून करण्यात आली आहे.
जर तात्काळ प्रभावी पर्यावरणीय उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर संबंधित विभाग व अधिकाऱ्यांविरोधात नुकसानभरपाईची मागणी करण्याचा इशारा देखील संस्थेकडून देण्यात आला आहे.या संदर्भात ‘आदी जनता मच्छीमार सहकारी सोसायटी’चे चेअरमन तसेच संयुक्त प्रदूषण निर्मूलन संघर्ष समितीचे पदाधिकारी यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन सादर केले आहे.


