
‘जातीभेद गाडून हिंदू म्हणून संघटित व्हा!’
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे ‘विराट हिंदू धर्म संमेलना’चे भव्य आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात उपस्थित हजारो हिंदू बांधवांना संबोधित करताना संतांनी हिंदू धर्माची श्रेष्ठता आणि भविष्यातील आव्हानांवर परखड विचार मांडले. यावेळी ‘जातीभेद दूर करून एकसंध हिंदू म्हणून जगणे हीच काळाची गरज आहे’, असा सूर उमटला.
कार्यक्रमाची सुरुवात संतांच्या भव्य स्वागताने आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने झाली. या संमेलनाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूजनीय महामंडलेश्वर जनार्दनहरी महाराज (निष्कलंक धाम, फैजपूर मठाधिपती) उपस्थित होते.
मंचावर पूजनीय येळमकर बाबा (महानुभाव अंबेवडगाव), पूजनीय आत्मारानंदजी महाराज (वृंदावन धाम), हभप योगेश महाराज, पूजनीय श्री शाम चैतन्य महाराज (गुरुदेव सेवाश्रम), आचार्य मानेकर बाबा शास्त्री (महानुभाव सावदा गादीपती दत्त मंदिर), गिरीश मोरे, आबासाहेब (श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र) आणि विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत मंत्री योगेश्वरजी गर्गे आदि मान्यवर उपस्थित होते.
हिंदू संमेलन कशासाठी?
योगेश्वरजी गर्गे – विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत मंत्री श्री. योगेश्वरजी गर्गे यांनी ‘हिंदू संमेलन कशासाठी?’ या विषयावर मार्गदर्शन केले. सध्याच्या परिस्थितीत हिंदू समाजाने एकत्र येणे का आवश्यक आहे, याचे महत्त्व त्यांनी सोदाहरण पटवून दिले.
जनगणनेत ‘हिंदू‘ म्हणून नोंद करा : महामंडलेश्वर
आपल्या ओघवत्या वाणीतून मार्गदर्शन करताना महामंडलेश्वर जनार्दनहरी महाराज यांनी सकल हिंदू समाजाला काही महत्त्वपूर्ण आवाहन केले. ते म्हणाले की, जनगणना आणि ओळख: “येणाऱ्या काही दिवसांत जेव्हा जनगणना सुरू होईल, तेव्हा आपली जात सांगण्यासोबतच ‘हिंदू’ धर्म गर्वाने नमूद करा. आपली ही एकजूट आकडेवारीतूनही दिसणे आवश्यक आहे. ”
देशाचे रक्षण : “हा देश इस्लामी जिहादी प्रवृत्तींपासून वाचवायचा असेल, तर हिंदूंनी आपली जनसंख्या वाढवण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ”
जातीभेद निर्मूलन : “जोपर्यंत आपण जातीपातीत विभागले गेलो आहोत, तोपर्यंत आपण कमकुवत आहोत. सर्व जातीभेद विसरून केवळ ‘हिंदू’ म्हणून जगण्याचे आणि संघटित होण्याचे सामर्थ्य दाखवा. ”या विराट संमेलनामुळे संपूर्ण लोहारा परिसरात भक्तिमय आणि राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाची सांगता अत्यंत उत्साहात ‘महाराष्ट्र गीता’ने करण्यात आली. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि सकल हिंदू समाजाने अथक परिश्रम घेतले.


