जळगाव प्रतिनिधी । गुंतवणुकीच्या नावाखाली ५ लाख २० हजार रुपयांची फसवणूक आणि अपहरण करून दरोडा टाकणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तीन संशयित आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून, विशेष म्हणजे यात वाशिम पोलीस मुख्यालयातील एका कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.
चोपडा तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी जगदीश व्यास यांना सोमवारी २७ एप्रिल रोजी १२.३० वाजेच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून संपर्क साधून, १ लाखाच्या गुंतवणुकीवर ५ लाखांचा परतावा देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडत फिर्यादी यांचा मुलगा पंकज व्यास हे ५ लाख २० हजार रुपये घेऊन हॉटेल कमल पॅराडाईज येथे पोहोचले. तिथे असलेल्या आरोपींनी ‘येथे पोलीस चेकिंग सुरू आहे’ असे सांगून कारसह पंकज यांना सोबत नेले आणि त्यानंतर पैसे हिसकावून घेत पोबारा केला.
या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व त्यांच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे ही टोळी छत्रपती संभाजीनगर येथील करमाडा भागात असल्याचे पोलिसांना समजले. पथकाने तातडीने धाव घेत प्रकाश लक्ष्मण शिंदे, स्वप्नील दिलीप दळवी आणि पोलीस कर्मचारी भागवत दत्ताराव कष्टे या तिघांना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना पुढील तपासासाठी शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या टोळीतील काहींवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.



