जळगाव प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात तापमानाने कहर केला आहे. त्यात आज मंगळवारी जळगावचे तापमान तब्बल ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचले असताना शिरसोली नाका परिसरात धावत्या अॅक्टिव्हाने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. सुदैवाने दुचाकीवरील दोघांनी प्रसंगावधान राखत उडी मारल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत दुचाकी जळून खाक झाल्याचे समोर आले आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील शिरसोली नाका परिसरातून योगेश महाजन (वय ४६) व हितेन महाजन (वय १८) हे दोघेजण मोपेड गाडी ॲक्टीव्हाने जात होते. त्यावेळी त्यांच्या अॅक्टिव्हामधून अचानक ठिणग्या निघाल्या आणि काही क्षणातच वाहनाने पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच दोघांनी तत्काळ वाहन सोडून जीव वाचवला.
घटनेनंतर परिसरात काही काळ धावपळ उडाली. नागरिकांनी तातडीने धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात आली; मात्र तोपर्यंत अॅक्टिव्हा पूर्णपणे जळून खाक झाली होती. प्राथमिक अंदाजानुसार प्रचंड उष्णता, इंजिनवरील ताण किंवा वायरिंगमधील बिघाडामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यावेळी या आगीत दुचाकी पुर्णपणे जळून खाक झाली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.



