अमळनेर प्रतिनिधी | शासकीय कामासाठी किंवा अवैध कामांना परवानगी देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नावाने लाच मागणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमळनेर तालुक्यातील लोणपंचम आणि झाडी येथील दोन खाजगी व्यक्तींविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. तहसिलदारांच्या नावाने ५० हजार रुपयांची लाच मागून त्यापैकी २५ हजार रुपये स्वीकारताना जितेंद्र राजेंद्र पाटील याला रंगेहात पकडण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार यांचा गौण खनिज (वाळू) वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्या दोन ट्रॅक्टरने मौजे मांडळ येथील पांझरा नदीतून वाळूची वाहतूक करू देण्यासाठी खाजगी इसम रामराव हरचंद पाटील (वय ६४, रा. लोणपंचम) आणि जितेंद्र राजेंद्र पाटील (वय २६, रा. झाडी) यांनी तक्रारदाराकडे तहसिलदारांच्या नावाने पैशांची मागणी केली होती. प्रति ट्रॅक्टर २५ हजार याप्रमाणे दोन ट्रॅक्टरचे एकूण ५० हजार रुपये लाच म्हणून मागण्यात आले होते.
तक्रारदाराने याप्रकरणी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.
या तक्रारीची शहनिशा करण्यासाठी २८ एप्रिल रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. यावेळी रामराव पाटील आणि जितेंद्र पाटील यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. या सापळ्यात आरोपी जितेंद्र पाटील याला एका ट्रॅक्टरचे २५ हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



