जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र पोलीस दलात उत्कृष्ट सेवा, कर्तव्यदक्षता आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांना दिला जाणारा मानाचा ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ पुरस्कार २०२५ जाहीर झाला असून, यामध्ये जळगाव जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिल्ह्यातील तब्बल २८ अधिकारी आणि अंमलदारांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी २९ एप्रिल रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले. या यादीत जळगाव जिल्ह्यातील ५ अधिकारी आणि २३ अंमलदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गुन्हे शाखा, विशेष शाखा, श्वान पथक तसेच बँड पथकातील कर्मचाऱ्यांनीही आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवत हा सन्मान पटकावला आहे.
पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये चोपडा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब घोलप, श्वान पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल फुसे, तसेच रवींद्र गायकवाड, भरतसिंग पाटील यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे नितीन बाविस्कर, अकरम शेख आणि जिल्हा विशेष शाखेच्या मीनाक्षी सावळे यांनाही या सन्मानाने गौरविण्यात आले आहे.
या यशाबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत, हा सन्मान संपूर्ण पोलीस दलाच्या सांघिक प्रयत्नांचे प्रतीक असल्याचे सांगितले. या कामगिरीमुळे जळगाव पोलीस दलाचा लौकिक अधिक उंचावला असून, जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सध्या पोलीस दलात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



