चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील दस्केबर्डी शिवारात जुन्या वादाच्या कारणावरून एका शेतकऱ्याच्या शेतातील उभ्या मक्याच्या पिकाला आणि ठिबक सिंचनाच्या नळ्यांना आग लावून नुकसान केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनमध्ये संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चेतन गोविंदा बोरसे (वय २४, रा. दस्केबर्डी, ता. चाळीसगाव) यांचे दस्केबर्डी शिवारातील गट नं. ८२ मध्ये शेत आहे. मागील वर्षी झालेल्या एका वादाचा राग मनात धरून संशयित आरोपी शामकांत बाबुलाल महाजन (रा. खेडगाव, ता. चाळीसगाव) याने रविवारी, २७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चेतन बोरसे यांच्या शेतात प्रवेश केला.
आरोपीने स्वतःच्या हातातील माचिसने फिर्यादीच्या शेतातील दोन एकर मक्याच्या पिकाला आणि तिथे असलेल्या ठिबक सिंचनाच्या नळ्यांना आग लावून दिली. या भीषण आगीत सुमारे ३० हजार रुपये किमतीचे मक्याचे पीक आणि १०,००० रुपये किमतीच्या जुन्या ठिबक नळ्या, असे एकूण ४० हजार रूपयांची शेती साहित्याचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी चेतन बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कुशल शिपी करत आहेत.



