कासोदा प्रतिनिधी । तालुक्यातील हनुमंतखेडे परिसरातून विनापरवाना वाळूची चोरी करून वाहतूक करणाऱ्या एका ट्रकवर कासोदा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १० लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २८ एप्रिल रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली. हनुमंतखेडे कडून एरंडोलकडे जाणाऱ्या ताडे गावच्या हद्दीत एका संशयित ट्रकची (क्र. MH 46 BB 5421) तपासणी केली असता, त्यामध्ये विनापरवाना दोन ब्रास वाळू भरलेली असल्याचे आढळून आले. या वाळूची किंमत साधारण ६ हजार रुपये असून, १० लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण १० लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश गोविंद पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी चालक ईरफान नबी पठाण (वय ३३, रा. अंधारी, ता. सिल्लोड, जि. छञपती संभाजी नगर) याच्या विरुद्ध कासोदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला.



