भुसावळ प्रतिनिधी | वरणगाव शहरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगर येथील काजीपुरा परिसरातील २३ वर्षीय सर्फराज सय्यद या तरुणावर अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला. या हल्ल्यात सर्फराज गंभीर जखमी झाला असून, त्याला जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
सर्फराज हा एका कंपनीत डंपर चालक म्हणून कामाला असून, कामाच्या निमित्ताने तो वरणगाव परिसरात आला होता. याचवेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. वैयक्तिक वाद की पूर्ववैमनस्य, या दिशेने तपास होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वरणगाव शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी रामपेठ परिसरातील सट्टा पेढीवर गोळीबार झाल्याची चर्चा होती. तसेच शहरात अवैध सट्टा आणि विनापरवाना बनावट देशी दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून केल्या जात आहेत.
या पार्श्वभूमीवर वारंवार घडणाऱ्या हिंसक घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. गोळीबारातील फरार आरोपीला तातडीने अटक करावी, तसेच अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आता पोलीस प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



