पारोळा प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील कानोश्री पेट्रोल पंपाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २८ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समाधान सुकदेव पाटोळे (वय ३८) आणि संतोष आत्माराम पाटील (वय ७०, दोन्ही रा. मोंढाळे, ता. अमळनेर) हे आपल्या ‘हिरो फॅशन प्रो’ दुचाकीने (क्रमांक MH 19 BR 8748) मोंढाळेकडून करंजीकडे जात होते. त्याचवेळी रस्त्याच्या विरुद्ध बाजूने येणाऱ्या ‘हिरो होंडा स्लेंडर’ दुचाकीने (क्रमांक MH 39 B 4788) त्यांना जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, समाधान पाटोळे आणि संतोष पाटील या दोघांच्याही डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताला कारणीभूत ठरलेला दुसऱ्या दुचाकीचा चालक गजानन मांगु पवार (रा. बोळे तांडा, ता. पारोळा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने आपली दुचाकी हयगयीने आणि निष्काळजीपणे चालवून समोरून येणाऱ्या पाटोळे यांच्या गाडीला जोरदार धडक दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी मृतांचे नातेवाईक नितीन महारू पाटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक गजानन पवार याच्या विरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासत आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल दुकळे करत आहेत.



