जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील कानळदा रोडवरील समर्थ लॉनजवळ मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण घटना घडली आहे. दुचाकीला झालेल्या या अपघातात २७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. मात्र, मृतदेहाची अवस्था आणि घटनास्थळाची परिस्थिती पाहता नातेवाईकांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा खळबळजनक संशय व्यक्त केला आहे.
अक्षय संजय देशमुख (वय २७) आणि त्याचा मित्र गणेश पवार हे दोघे धानोरा येथून आपल्या मित्राच्या लग्नानिमित्त आयोजित हळदीचा कार्यक्रम आटोपून जळगावकडे परतत होते. मध्यरात्री साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास कानळदा रोडवरील समर्थ लॉनजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या घटनेत अक्षय देशमुख याचा जागीच मृत्यू झाला, तर गणेश पवार हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी गणेशवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या घटनेची माहिती मिळताच अक्षयच्या नातेवाईकांनी रुग्णालयात आणि घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अक्षयच्या शरीरावर अपघाताच्या तुलनेत इतर जखमांचे प्रमाण कमी असणे आणि दुचाकीचेही फारसे नुकसान न झाल्याने नातेवाईकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे. “हा निव्वळ अपघात असू शकत नाही, तर हा घातपाताचा प्रकार आहे,” असा आरोप अक्षयच्या भावाने आणि नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाची पोलिसांनी तातडीने आणि सखोल चौकशी करावी, अशी मागणी कुटुंबाकडून करण्यात आली आहे.
या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. हा खरोखरच अपघात आहे की त्यामागे काही वेगळे कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून अक्षयच्या मृत्यूने देशमुख परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



