भुसावळ प्रतिनिधी | शहरात बेकायदेशीररीत्या अग्नीशस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या दोन तरुणांना बाजारपेठ पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. शिरपूर-कन्हाळा रोडवरील घोडे पीर बाबा दर्ग्याच्या परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपींकडून एक गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूस असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील शिरपूर-कन्हाळा रोडवरील मोकळ्या जागेत १४ मे रोजी मध्यरात्री काही संशयास्पद हालचाली होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल टी. वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष पथकाने तातडीने छापेमारी केली. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना पोलिसांनी घेराव घालून ताब्यात घेतले.
आरोपींची ओळख आणि जप्त मुद्देमाल :
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये असद अली शेख खालीद अली (वय १९, रा. बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) आणि मोहम्मद राजीक मोहम्मद आरिफ (रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ) यांचा समावेश आहे. आरोपींकडून ४० हजार रुपये किमतीचे काळ्या प्लास्टिक ग्रीपचे लोखंडी पिस्तुल आणि १ हजार रुपयांचे जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे.
पुढील कायदेशीर कारवाई :
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जावेद हकीम शाह यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध आर्म ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल केदारे करत आहे..



