चाळीसगाव प्रतिनिधी | चाळीसगाव-नागद रस्त्यावरील वाघडू गावाच्या पुढे एका हॉटेलजवळ दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात २३ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. निकीता साईनाथ झालटे (वय २३, रा. ठाणे) असे मृत तरुणीचे नाव आहे. या अपघातात अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी दुचाकी चालक प्रेम चंद्रभान झालटे (रा. हातले, ता. चाळीसगाव) हा त्याच्या ताब्यातील हिरो कंपनीची मोटरसायकल ( एमएच ५२ ए ५२१२) चाळीसगावकडून नागदच्या दिशेने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवत होता.
वाघडू गावानजीक रस्त्यावरील एका डंपरला उजव्या बाजूने चुकीच्या पद्धतीने (रॉंग साईड) ओव्हरटेक करण्याच्या नादात, समोरून येणाऱ्या बजाज डिस्कव्हर मोटरसायकलला (क्र. MH 12 JZ 3258) त्याने जोराची धडक दिली.
या भीषण अपघातात आरोपीच्या पाठीमागे बसलेली निकीता झालटे ही गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. तर दुसरीकडील दुचाकी चालक शिवनाथ संतोष गांगुर्डे (रा. वाघळी, ता. चाळीसगाव) आणि इतर दोन जण जखमी झाले आहेत. अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी सलोनो साईनाथ झालटे (वय २१) हिच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.



