जामनेर प्रतिनिधी | गोवंशाची अवैध वाहतूक, कत्तल आणि अनधिकृत कत्तलखान्यांना आळा घालण्यासाठी जामनेर पोलीस प्रशासन व नगर परिषद प्रशासनाने संयुक्तपणे शहरात एक मोठी विशेष मोहीम राबवली. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ६७ गोवंश प्रजातीच्या जनावरांची सुटका केली असून, त्यांची रवानगी जळगाव येथील गोशाळेत सुरक्षितपणे करण्यात आली आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, पोलीस आणि प्रशासनाच्या संयुक्त पथकाने जामनेर शहरातील घोडे पीर बाबा घरकुल परिसर, मदनी नगर, इस्लामपुरा आणि पहूर गल्ली या संशयित भागात अचानक छापा टाकला. या शोधमोहिमे दरम्यान सुमारे ६ लाख १० हजार रुपये किमतीचे ६७ गोवंश जनावरे जप्त करण्यात आली. तसेच एका ठिकाणी गोवंश मांस देखील आढळून आले. याप्रकरणी बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या आरोपींविरोधात महाराष्ट्र प्राणिसंरक्षण अधिनियम १९७६ अन्वये जामनेर पोलीस ठाण्यात एकूण ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदर कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात जामनेरचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन बागुल, तसेच पहूर आणि फत्तेपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, आरोग्य निरीक्षक आणि सफाई कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
जामनेर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि शासनाच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहीमा यापुढेही सातत्याने राबविल्या जातील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.



