जळगाव प्रतिनिधी : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी जळगाव जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र, नशिराबाद येथे जैन उद्योग समूह आणि होमगार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात विविध प्रकारची वृक्षलागवड करून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी आवश्यक वृक्षरोपे जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड, जैन हिल्स, शिरसोली रोड, जळगाव यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली. वृक्षारोपणानंतर या रोपांचे संगोपन करण्याची जबाबदारीही सर्वांनी सामूहिकपणे स्वीकारली.
कार्यक्रमाला केंद्र नायक गंगाधर महाजन, पलटण नायक मदन रावते, समादेशक अधिकारी संजय पाटील, वरिष्ठ पलटण नायक अनिल पाटील, रवींद्र ठाकूर, भारती बडगुजर तसेच जैन हिल्सचे मदन लाठी यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी वृक्षलागवडीचे महत्त्व सांगत प्रत्येकाने दरवर्षी किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन केले.
यावेळी होमगार्ड जवानांनीही पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि हरित क्षेत्राचे घटते प्रमाण लक्षात घेता अशा उपक्रमांची गरज अधिक असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
जैन उद्योग समूह आणि जळगाव जिल्हा होमगार्ड यांच्या या संयुक्त उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले. भविष्यातही पर्यावरण संवर्धनासाठी अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.



