जळगाव प्रतिनिधी | जळगाव येथील मेहरूण तलाव परिसरातील सिद्धार्थ लॉन येथे योग शिक्षक सुनील गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ओम योगा क्लासला १४ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने योगासन स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. गुरव यांनी परीक्षकांचा परिचय करून देत पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
स्पर्धेसाठी योग पंडित अरविंद सापकर आणि योग पंडित डॉ. भावना चौधरी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेपूर्वी दहा दिवस सहभागी योगसाधकांकडून विविध योगासनांचा नियमित सराव करून घेण्यात आला होता.
या स्पर्धेत डॉ. दिलीप पाटील, होरिलसिंग राजपूत, गणेश राणे, प्रशांत शिंदे, डॉ. पंकज पाटील, माधुरी पाटील, गोपाल चुघरा, नरेश कावणा, सुरेश जोशी, अजितकुमार जैन, प्रेम कटारिया, प्रा. निलेश घडेकर, राजेश हिंगु, विजय कुकरेजा आणि प्रमोद संचेती अशा १५ योगसाधकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेनंतर परीक्षकांनी योगसाधकांचे कौतुक करत नियमित योगाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या शेवटी योग शिक्षक सुनील गुरव यांनी उपस्थितांचे आभार मानले.



