एरंडोल प्रतिनिधी | डिजिटल माध्यमांचा वाढता वापर आणि त्यातून होणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर डी. डी. एस. पी. ज्युनिअर कॉलेज, एरंडोल येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर क्राईम व सायबर सुरक्षेविषयी जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. ऑनलाइन व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थिनी कुमारी स्नेहल पाटील आणि कुमारी वैष्णवी पाटील यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार समजावून सांगितले. सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवणे, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, OTP, पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही न देणे, तसेच QR कोडच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले.
विशेषतः AI Voice Scam या नव्या प्रकारच्या फसवणुकीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ओळखीच्या व्यक्तीचा हुबेहुब आवाज तयार करून फोन किंवा मेसेजद्वारे पैशांची मागणी केली जाऊ शकते. त्यामुळे अशा संदेशांवर किंवा फोनवर तात्काळ विश्वास न ठेवता संबंधित व्यक्तीशी प्रत्यक्ष किंवा दुसऱ्या माध्यमातून संपर्क साधून खात्री करावी, असे सांगण्यात आले.
ऑनलाइन फसवणूक झाल्यास घाबरून न जाता तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, असेही मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेविषयी माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



