जळगाव प्रतिनिधी | कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव तालुक्यातील भादली येथे खरीप पीक पाहणी तसेच नाविन्यपूर्ण ओवा पीक पेरणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी स्वतः ओवा पिकाची पेरणी करून या नाविन्यपूर्ण उपक्रमाला सुरुवात केली. पारंपरिक पिकांबरोबरच शेतकऱ्यांनी बदलत्या बाजारपेठेचा आणि उपलब्ध संधींचा विचार करून विविध पिकांच्या लागवडीकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.
पीक पद्धतीत बदल केल्यास शेतीतील जोखीम कमी करण्याबरोबरच शेतकऱ्यांना नवीन उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण आणि बाजारपेठेत मागणी असलेल्या पिकांची लागवड करण्याचा प्रयत्न करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी खरीप हंगामातील विविध पिकांची पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, पीक उत्पादन आणि शेतीतील विविध प्रयोगांविषयी माहिती घेण्यात आली. ओवा पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पर्यायी पीक पद्धतीचा प्रयोग करता यावा, हा उपक्रमाचा उद्देश आहे.



