जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यात प्रॉपर्टी संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक निर्माण करण्यासाठी जिल्हा पोलिसांकडून ‘प्रतिबंधात्मक ऑपरेशन ३०५’ ही विशेष मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली.
भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०५ अंतर्गत मालमत्ता चोरीसह घरफोडी, वाहनचोरी तसेच शासकीय किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या मालमत्तेची चोरी याबाबतच्या गुन्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
या मोहिमेदरम्यान १७५ भंगार दुकानांची तपासणी, २६९ रेकॉर्डवरील आरोपींची चौकशी आणि ४४२ संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. तसेच मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम १२२, १२४ आणि १४२ अन्वये ५ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या, तर २३ एनबीडब्ल्यू वॉरंटची बजावणी करण्यात आली.
अवैध धंद्यांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. दारूबंदी कायद्यान्वये ३६ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ७३८ लिटर गावठी दारू, ६२३० लिटर कच्चे रसायन तसेच देशी-विदेशी दारू व बिअरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. आर्म्स ॲक्टअंतर्गतही कारवाई करण्यात आली. याशिवाय अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करत एक डंपर व १५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना संशयास्पद व्यक्ती, वाहन किंवा हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.



