जळगाव प्रतिनिधी | जुने जळगाव परिसरात शेतकरी बांधवांनी पारंपरिक बैलपोळा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला. वर्षभर शेतकऱ्यांसोबत शेतातील विविध कामांमध्ये राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी त्यांची विशेष पूजा केली जाते.
बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांना आकर्षक पद्धतीने सजविले होते. बैलांच्या अंगावर रंगीबेरंगी झूल चढविण्यात आली होती. तसेच गोंडे, फुलांच्या माळा, विविध अलंकार आणि पारंपरिक सजावटीच्या साहित्याने बैलांचे रूप अधिकच खुलून दिसत होते. सजलेल्या बैलांना पाहण्यासाठी परिसरातील नागरिक आणि लहान मुलांचीही उत्सुकता पाहायला मिळाली.
सजावट पूर्ण झाल्यानंतर शेतकरी कुटुंबीयांनी बैलांचे विधिवत पूजन केले. त्यांच्या कपाळावर कुंकू-हळदीचा टिळा लावून आरती करण्यात आली. त्यानंतर बैलांना नैवेद्य दाखवून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शेतकरी बांधवांसह महिला आणि कुटुंबातील सदस्यांमध्येही मोठा उत्साह दिसून आला.
शेती, शेतकरी आणि बैल यांचे अतूट नाते अधोरेखित करणारा हा सण जुने जळगाव परिसरात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. आधुनिक युगातही आपल्या ग्रामीण संस्कृतीची आणि परंपरेची जपणूक करण्याचा संदेश या उत्सवातून देण्यात आला.
बैलपोळ्याच्या निमित्ताने परिसरात दिवसभर उत्साह, आनंद आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.



