यावल प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या अट्रावल येथील मुंजोबा मंदिराच्या विविध विकासकामांना आता मोठी चालना मिळणार आहे. मंदिर परिसराच्या विकासासाठी तब्बल २ कोटी ३१ लाख ८९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रयत्नातून या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
अट्रावल येथे यात्रोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असतात. त्यामुळे मंदिर परिसरात प्रचंड गर्दी होते आणि भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हीच बाब लक्षात घेऊन मंदिर आणि तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या निधीतून होणाऱ्या विविध विकासकामांमुळे भाविकांसाठी आवश्यक सुविधा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे. प्रशासकीय मान्यता मिळाल्याने आता विकासकामांना लवकरच सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, मुंजोबा देवस्थानासाठी मोठा निधी मंजूर झाल्याबद्दल अट्रावलसह भालोद आणि चितोडा परिसरातील ग्रामस्थ व भाविकांकडून आमदार अमोल जावळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
या विकासकामांमुळे अट्रावलचे मुंजोबा मंदिर जिल्हाभरातील भाविकांसाठी अधिक आकर्षणाचे आणि सुविधायुक्त तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



