जळगाव प्रतिनिधी | चालक दिनानिमित्त वाहतूक संघटना संयुक्त महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी सोलापूर येथे भव्य ‘चालकरत्न पुरस्कार सोहळा’ उत्साहात पार पडला. राज्यातील २७ जिल्ह्यांमधील १२७ ऑटो रिक्षाचालकांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘चालकरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील प्रल्हाद सोनवणे यांना त्यांच्या दीर्घकाळातील प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष सेवेसाठी राज्यस्तरीय ‘चालकरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोनवणे हे गेल्या ३० वर्षांपासून ऑटो रिक्षाचालक म्हणून प्रवाशांना सेवा देत आहेत. तसेच ऑटो रिक्षाचालक-मालकांच्या समस्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या विकासासाठी त्यांनी ‘नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन, जळगाव जिल्हा’ची स्थापना केली आहे. या माध्यमातून जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील रिक्षाचालकांच्या जीवनमानासाठी ते कार्यरत आहेत.
महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाजभाई सैय्यद आणि प्रदेश उपाध्यक्ष इरफान शेख यांच्या हस्ते प्रल्हाद सोनवणे यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील ११ रिक्षाचालकांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये तन्वीर शफीउल्ला, नरेंद्र ताराचंद पाटील, शेख नबी शेख करीम कुरेशी, मुश्ताक शाह पीरन शाह, तौसिफ अहमद अल्ताफ शेख, शाम सूर्यवंशी, मुश्ताक शेख मुख्तार, प्रल्हाद भाऊ सोनवणे, प्रमोद सपकाळे, संजय एकनाथ शिंदे आणि कैलास रामचंद्र साळुंखे यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाला सोलापूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आसिफ मुलानी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सैय्यद होते. त्यांनी रिक्षाचालकांच्या हक्कांसाठी आणि विविध समस्यांच्या निवारणासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.



