जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील गजबजलेल्या गोलाणी मार्केटमध्ये चोरट्यांनी मध्यरात्री धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी एक मोबाईल दुकान फोडून दुरुस्तीसाठी आलेले सुमारे ५० हजार रुपये किमतीचे चार मोबाईल चोरून नेले. तसेच अन्य दोन दुकानांचे लॉक तोडून चोरीचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकारात चार संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे.
गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावरील दुकान क्रमांक ८ मधील सनशाईन मोबाईल या दुकानाला चोरट्यांनी प्रथम लक्ष्य केले. दुकानमालक सौरभ खियलदास केसवानी यांनी रात्री साडेनऊच्या सुमारास दुकान बंद केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर बाजूचे लॉक आणि कडी तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र, दुकानाला असलेल्या सेंट्रल लॉकमुळे चोरट्यांना आत प्रवेश करता आला नाही. दुकानात सुमारे ३० ते ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल असल्याने मोठी चोरी टळल्याचे सांगण्यात येत आहे.
यानंतर चोरट्यांनी पहिल्या मजल्यावरील विशाल मोबाईल दुकान फोडले. दुकानमालक विशाल मधुकर शिंपी यांना शेजारील दुकानदाराने सकाळी फोन करून चोरीची माहिती दिली. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दुरुस्तीसाठी आलेले अंदाजे ५० हजार रुपये किमतीचे चार मोबाईल लंपास केले. दुकानातील ड्रॉवरही फोडण्यात आला.
त्यानंतर चोरट्यांनी रुद्र फूटवेअर दुकानाचे साईड लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दुकानातून कोणतीही चोरी झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आलेले नाही. दुकानात सुमारे दोन लाख रुपयांचा माल असल्याची माहिती आहे.
एकाच रात्री तीन दुकानांना लक्ष्य केल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमध्ये एकाच टोळीचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, चार संशयित सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून, त्यांच्या हालचालींच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.
या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. गोलाणी मार्केटसारख्या प्रमुख व्यापारी संकुलातील या घटनेमुळे रात्रीच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.



