रावेर प्रतिनिधी : तालुक्यातील दोधा गावात पैशांच्या कारणातून ७२ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रावेर पोलिसांनी १९ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
मयत महिलेचे नाव ललिताबाई वसंत पाटील (वय ७२, रा. दोधा, ता. रावेर) असे आहे. तर ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव लाला धर्मा भिलाला (वय १९) असे असून, तो दोधा येथे सालदार म्हणून काम करत असल्याची माहिती आहे. त्याचे मूळ गाव नसीराबाद बोरी, ता. नेपानगर, जि. बुऱ्हाणपूर असल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीची पत्नी काही दिवसांपूर्वी माहेरी गेली होती. तिने आरोपीकडे ३० हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास दुसरे लग्न करण्याची धमकी दिल्याने आरोपीवर पैशांसाठी दबाव असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटनेच्या दिवशी दुपारी साडेएकच्या सुमारास आरोपी घराच्या मागील बाजूने ललिताबाईंच्या घरात शिरला. त्यानंतर स्वतःच्या बेल्टने त्यांचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. खून केल्यानंतर त्याने महिलेच्या अंगावरील दागिने काढून घेतले आणि घटनास्थळावरून निघून गेला.
यानंतर आरोपी नेहमीप्रमाणे वावरत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने लपवून ठेवलेले दोन हार आणि कानातील दागिने पोलिसांच्या स्वाधीन केले. संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून, पुढील तपास रावेर पोलीस करीत आहेत.



