जामनेर प्रतिनिधी | तालुक्यातील कुंभारी गावात सिमेंटच्या बाकड्याच्या वादातून धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे.
ग्रामपंचायतीचे सिमेंटचे बाकडे ठेवण्यावरून सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान थेट दुचाकीला कारने जोरदार धडक देण्यात झाले. या भीषण अपघातात 52 वर्षीय ज्ञानेश्वर उत्तम मोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा यश मोरे गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुंभारी गावात सिमेंटचे बाकडे ठेवण्यावरून गेल्या काही दिवसांपासून ज्ञानेश्वर मोरे आणि त्यांचा मुलगा यश मोरे यांचा गावातील बाळू उत्तम जोशी, शांताराम उत्तम जोशी आणि अजय त्र्यंबक जोशी यांच्यासोबत वाद सुरू होता. याच वादाच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर मोरे आणि यश मोरे हे तक्रार देण्यासाठी पहूर पोलीस ठाण्याकडे दुचाकीवरून निघाले होते.
दरम्यान, ते पोलीस ठाण्याकडे जात असल्याची माहिती संशयितांना मिळाल्यानंतर त्यांच्या दुचाकीचा पाठलाग करून कारने जोरदार धडक दिल्याचा आरोप आहे. (एमएच १९ ईओ ९७६९) क्रमांकाच्या कारने दिलेल्या धडकेत ज्ञानेश्वर मोरे गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, तर मुलगा यश मोरे गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर कुंभारी गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी संशयित आरोपी बाळू उत्तम जोशी याला अटक केली आहे. इतर संशयितांची भूमिकाही तपासली जात आहे.
सिमेंटच्या बाकड्याच्या वादातून सुरू झालेला संघर्ष एका कुटुंबासाठी काळाचा घाला ठरला असून, या घटनेने कुंभारी गाव हादरले आहे.



