अमळनेर : तालुक्यातील भिलाली येथे जातीवाचक शिवीगाळ आणि वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांत विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून, एकूण २० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी १८ जणांना अटक करण्यात आली असून, दोघे फरार आहेत.
प्रवीण पंडित घोडे यांच्या फिर्यादीनुसार, दोन युवक जातीवाचक द्वेषपूर्ण चर्चा करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत विचारणा केल्याचा राग आल्याने संबंधित युवकांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर गावातील पोलीस पाटील व नागरिकांना मंदिर परिसरात बोलावण्यात आले. यावेळी जमाव जमून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ज्ञानेश्वर भारतसिंग गिरासे यांनीही फिर्याद दिली आहे. महादेव मंदिर चौकात गर्दी जमल्याने तेथे थांबले असता शिवीगाळ व मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. गावात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत असून, दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे.



