जळगाव प्रतिनिधी | चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध शस्त्रास्त्रांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत मोठी यश मिळवले आहे. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे पोलिसांनी लासूर-मोटेकर रोडवर सापळा रचून तीन संशयितांना बेड्या ठोकल्या.
या आरोपींच्या ताब्यातून तीन गावठी बनावटीचे कट्टे आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लासूर गावापुढील मोटेकर रोडवर काही तरुण बेकायदेशीररीत्या शस्त्रे घेऊन वावरत असल्याची गोपनीय माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती.
या माहितीची तात्काळ दखल घेत पोलीस पथकाने परिसरात नाकेबंदी करून सापळा रचला. संशयित हालचाली करणाऱ्या तीन तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे ३ गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे मिळून आली.
या कारवाईत पोलिसांनी साहिल दामू आव्हारे, सौरभ संतुराम मोतीरावे आणि रोहित चंद्रकांत जुंजागर या तिघांना रंगेहात ताब्यात घेतले आहे.
आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या घातक शस्त्रांप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत (आर्म्स ॲक्ट) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.



