जळगाव प्रतिनिधी | शहरातील गणपतीनगर परिसरात मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या ७२ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात संशयितांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मीबेन शंकरलाल पटेल या १ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजता नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्या गणपतीनगर परिसरातील सुमन रेसिडेन्सीकडून अॅटलस हॉस्पिटलकडे जात असताना दुचाकीवरून दोन अज्ञात व्यक्ती त्यांच्या जवळ आले.
दुचाकीवर मागे बसलेल्या संशयिताने अचानक लक्ष्मीबेन यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली. घटनेनंतर दोन्ही संशयितांनी दुचाकीवरून भरधाव वेगाने घटनास्थळावरून पलायन केले.
हिसकावण्यात आलेली सोन्याची चेन सुमारे २० ग्रॅम वजनाची असून तिची अंदाजे किंमत ७० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर लक्ष्मीबेन पटेल यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानुसार पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.



