जळगाव प्रतिनिधी | हिमाचल प्रदेशातील खूनप्रकरणातील चार आरोपी मुंबईच्या दिशेने पलायन करत असताना जळगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकले. हिमाचल पोलिसांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर शनिपेठ पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवत चौघांना ताब्यात घेतले. चंदन कुमार, रोशन गोगल मुखिया, संतोष कुमार आणि अजित कुमार जोगा मेहतो अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हिमाचल प्रदेशातील मुकेश कुमार यांच्या खूनप्रकरणी ३० सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारू पिताना झालेल्या वादातून मुकेश कुमार यांचा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. घटनेनंतर आरोपी हिमाचलमधून पळून अंबाला येथे पोहोचले. तेथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेसने त्यांनी प्रवास सुरू केला.
दरम्यान, प्रवासात पैसे संपल्याने तसेच भूक लागल्याने आरोपी मोबाईल विकण्यासाठी जळगावात उतरल्याची माहिती समोर आली. आरोपी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे हिमाचल पोलिसांनी जळगाव पोलिसांना कळविले. त्यानंतर गुन्हे शोध पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवत चौघांचा शोध घेतला आणि त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, आरोपींचा ताबा घेण्यासाठी हिमाचल प्रदेशातील संबंधित पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी जळगावकडे रवाना झाले आहेत. पुढील कायदेशीर कारवाई हिमाचल पोलिसांकडून करण्यात येणार आहे.



