जळगाव प्रतिनिधी | आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलाने अवैध दारूविक्री आणि गावठी दारूच्या भट्ट्यांविरोधात धडक कारवाईला सुरुवात केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या सूचनेनुसार मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत विविध ठिकाणी पोलिस पथकांनी कारवाई केली.
जळगाव तालुक्यासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवैध गावठी दारू तयार करून तिची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार पोलिसांच्या पथकांनी संशयित ठिकाणांवर छापे टाकत अवैध दारूभट्ट्यांवर कारवाई केली.
या कारवाईदरम्यान गावठी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले. तसेच दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे कच्चे रसायन आणि इतर साहित्य जागेवरच नष्ट करण्यात आले. त्यामुळे अवैध दारू निर्मितीचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या कारवाईप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आगामी सण-उत्सवांच्या काळात अवैध दारूची विक्री आणि निर्मितीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कारवाई आणखी तीव्र केली जाण्याची शक्यता आहे.



