रावेर प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात रावेर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल नष्ट केला.
विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत तब्बल ३४५ लिटर हातभट्टी दारू तसेच गूळ-मोह मिश्रण असा सुमारे ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर तालुक्यातील काही भागांत अवैधरीत्या हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे, अमूल बच्छाव, पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन, संबंधित बीट अंमलदार आणि डीबी पथकाने विविध ठिकाणी कारवाई केली.
कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात तयार दारू आणि दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे गूळ-मोह मिश्रण आढळून आले. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल नष्ट केला. या कारवाईमुळे अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी दीपक सुरेश भालेराव (कुसुंबा), बिस्मिल्ला चादखा तडवी (पाडला), कृष्णा मधुकर राठोड (पाल), सुपडू भिवसेन तावडे (नेहता) आणि असलम हसन तडवी (पाल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांच्या कारवाईचे परिसरातील महिलांनी स्वागत केले असून, अवैध हातभट्टी दारूविरोधातील कारवाई सातत्याने सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच खानापूर आणि आहिरवाडी परिसरातून मध्य प्रदेशात होत असल्याच्या चर्चेतील देशी दारूच्या कथित तस्करीकडेही पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.



