जळगाव, जितेंद्र कोतवाल : जळगाव शहरातील मेहरुण बगीचा परिसरात सुरू असलेल्या काँक्रीटच्या गटारीच्या कामादरम्यान दुर्दैवी दुर्घटना घडली. शेतातील काम आटोपून घरी परतत असताना तोल जाऊन गटारीत पडल्याने ३५ वर्षीय नवल अर्जुन सोनवणे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रामेश्वर कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नवल सोनवणे हे रामेश्वर कॉलनी, जळगाव येथे पत्नी, आई, मुलगा आणि मुलीसह राहत होते. शेतातील काम आटोपल्यानंतर ते घरी परतत होते. यावेळी मेहरुण बगीच्यात सुरू असलेल्या काँक्रीटच्या गटारीच्या कामाच्या ठिकाणी त्यांचा अचानक तोल गेला आणि ते गटारीत पडले. या दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
नवल सोनवणे हे गेल्या सुमारे २० वर्षांपासून जळगाव एमआयडीसी परिसरातील चटई कंपनीत काम करत होते. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्यांनी अनेक वर्षे नोकरी केली. त्यांच्या पश्चात पत्नी भाग्यश्री, आई सुंदरबाई, मुलगा दर्शन आणि मुलगी इशू असा परिवार आहे.
दरम्यान, मेहरुण बगीच्यात सुरू असलेल्या गटारीच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, तसेच दुर्घटनेमागील नेमके कारण काय, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेची संबंधित यंत्रणेकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. नवल सोनवणे यांच्या आकस्मिक निधनाने सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.



