रावेर प्रतिनिधी | रावेर तालुक्यात आगामी काळात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर रावेर तहसील कार्यालयात ६७ गावांमधील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असा प्रश्न आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार अमोल जावळे यांनी उपस्थित केला. मात्र, काही प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता न आल्याने बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
रावेर तालुका दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरा जात असताना आगामी काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी प्रशासनाने कोणती तयारी केली आहे, याबाबत आमदारांनी माहिती मागवली. तसेच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची आवश्यकता, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे आणि नुकसानभरपाई यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय असणे आवश्यक असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी तहसीलदार संजय तायडे यांनी समन्वय साधत जलसंधारण विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि कृषी विभागाच्या कामकाजाबाबत माहिती मांडली. मात्र, काही मुद्द्यांवर अधिकाऱ्यांकडून समाधानकारक माहिती मिळाली नसल्याने संबंधित विभागांनी ठोस उपाययोजनांसह पुढील बैठकीत माहिती सादर करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
आगामी पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वीच प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, यावर बैठकीत भर देण्यात आला. पुढील दहा दिवसांत पुन्हा बैठक घेऊन पाणीटंचाईसंदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
या बैठकीला नगराध्यक्ष संगीता महाजन, बाजार समितीचे सभापती प्रल्हाद पाटील, तहसीलदार संजय तायडे, गटविकास अधिकारी विनोद मेढे, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, नगरसेवक पद्माकर महाजन, सावदा मंडळ प्रभारी विजय महाजन, शिवसेना पदाधिकारी राहुल पाटील, निंबोल तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील, पवन चौधरी, सामाजिक कार्यकर्ते अमोल महाजन, भाजपचे कोषाध्यक्ष अनंत महाजन (रसलपूर), भाजप कार्यकर्ते योगेश महाजन तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



