जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात सायबर भामट्यांनी ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली एका निवृत्त प्राध्यापकाची ५ लाख २० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. अतिरेक्यांशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप करत पोलिस कारवाईची भीती दाखवून ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी जळगाव येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा येथील जयकिसान सोसायटी परिसरात राहणारे निवृत्त प्राध्यापक विजयसिंग रामकृष्ण पवार हे या फसवणुकीचे बळी ठरले आहेत. संशयितांनी पोलिस अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्याशी व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल केला. यावेळी खाकी वर्दीतील व्यक्तीने अतिरेक्यांशी आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, अशी भीती दाखवली.
कारवाई टाळण्यासाठी बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगून संशयितांनी पवार यांच्यावर दबाव आणला. या भीतीपोटी त्यांनी ५ लाख २० हजार रुपये भरले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पैसे मागणाऱ्यांपासून नागरिकांनी सावध राहावे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून पैसे हस्तांतरित करू नयेत, असे आवाहन करण्यात येत आहे.



