जामनेर प्रतिनिधी | जामनेर शहरातील शिवम हॉटेलसमोर उभ्या असलेल्या दुचाकीच्या बॅगेतून अज्ञात चोरट्याने १ लाख १४ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर शिवदास लोखंडे (वय ३१, रा. संजय नगर, पाचोरा रोड, जामनेर) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. ज्ञानेश्वर लोखंडे हे १२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १:०० वाजेच्या सुमारास जामनेर शहरातील शिवम हॉटेलसमोर आपल्या मोटरसायकलसह (क्रमांक MH 19 ES 4711) थांबले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या मोटरसायकलला लावलेल्या बॅगेतून ५०० रुपयांच्या २८ नोटांसह एकूण १,१४,००० रुपयांची रोकड लबाडीच्या इराद्याने चोरून नेली.
आपली फसवणूक व चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्ञानेश्वर लोखंडे यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात १५ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रतापसिंग मथुर करत असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.



