जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहराजवळील बांभोरी उड्डाणपुलावर कार आणि कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पंकज प्रकाश चौधरी, हरीश हिंमत चौधरी आणि रवींद्र अरुण चौधरी अशी मृत तरुणांची नावे असून, हे तिघेही एकमेकांचे नातेवाईक होते. या दुर्घटनेमुळे झुरखेडे गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील झुरखेडे येथील हे तिघे तरुण भुसावळजवळील वनवली येथे देवीच्या यात्रेसाठी गेले होते. तेथे नातेवाईकाला सोडून ते कारने जळगावहून आपल्या गावी परतत असताना बांभोरी उड्डाणपुलावर समोरून येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर कार जागेवरच फिरली, तर कंटेनर उड्डाणपुलावरून खाली कोसळण्यापासून थोडक्यात बचावला. घटनेची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्दी केली.
दरम्यान, पाळधी-तरसोद बायपास बंद असल्याने अवजड वाहनांची वाहतूक जळगाव शहरातून वळविण्यात आली आहे. त्यामुळे शहर आणि परिसरातील अपघातांचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या अडीच महिन्यांत या वाहतूक व्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
बायपासचे काम आणि अवजड वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.



