जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील आदर्शनगर परिसरात कौटुंबिक वादातून शस्त्राने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. जावयाला मारण्यासाठी आलेल्या सासऱ्याने जावयाच्या चुलत भावांवर धारदार शस्त्राने वार केल्याचा आरोप आहे. १९ ऑक्टोबर रोजी रात्री घडलेल्या या घटनेत दोघे जखमी झाले असून, याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नीलेश सांगळे हा जावई करण घुगे याला मारण्यासाठी आदर्शनगर परिसरात आला होता. मात्र, यावेळी करण घुगे याच्या चुलत भावांवर त्याने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात मुकेश घुगे यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून, जखमेवर पाच टाके पडले आहेत. तर सचिन घुगे यांच्या पायालाही गंभीर दुखापत झाली आहे.
घटनेदरम्यान जावई करण घुगे घटनास्थळी आल्यानंतर आरोपीने त्याला धमकी दिली आणि तेथून पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या प्रकारामुळे आदर्शनगर परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी नीलेश सांगळे याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय तडवी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.



