जळगाव प्रतिनिधी| सध्या अनेक भागांत जाणवणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीबचत आणि जलसंवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी मेहरूण येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करत नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पाण्याचा वाढता वापर, पाण्याचा अपव्यय आणि जलस्रोतांचे संवर्धन या विषयांवर विद्यार्थ्यांनी विचारमंथन केले. पाणीटंचाई ही केवळ शासनाची समस्या नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.
कृती आराखड्यात नळाचा आवश्यक तेवढाच वापर करणे, पाण्याची गळती त्वरित दुरुस्त करणे, पावसाच्या पाण्याचे संकलन करणे, वापरलेल्या पाण्याचा योग्य पुनर्वापर करणे, वृक्षारोपण आणि जलस्रोतांचे संरक्षण अशा उपाययोजनांचा समावेश करण्यात आला. पोस्टर्स, घोषवाक्ये आणि जनजागृती उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये पाणीबचतीविषयी जागरूकता निर्माण करण्याचाही निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली आव्हाड यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. विद्यालयाच्या पर्यवेक्षिका शितल कोळी यांनीही दैनंदिन जीवनात पाणीबचतीच्या सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले.
‘थेंब थेंब पाणी वाचवूया, जलसमृद्ध भविष्य घडवूया!’ हा संदेश देत विद्यार्थ्यांनी पाणीबचतीची सुरुवात स्वतःपासून आणि आपल्या घरापासून करण्याचा संकल्प केला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीचा प्रभावी संदेश देण्यात आला.



