जळगाव, प्रतिनिधी | राज्यात एल निनोच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता, जळगाव जिल्ह्यातील अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात आणि वेळेत पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या तसेच अद्याप अपूर्ण असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित कंत्राटदार आणि अभियंते उपस्थित होते. संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण होणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
अपूर्ण योजनांच्या कामांना प्राधान्य देऊन त्यांची अंमलबजावणी वेगाने करावी, असे आवाहन करिश्मा नायर यांनी केले. कामे पूर्ण करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी कंत्राटदार, अधिकारी आणि अभियंत्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
संभाव्य पाणीटंचाईचा परिणाम कमी करण्यासाठी प्रशासनाला आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे संबंधित यंत्रणेने जबाबदारीने काम करून अपूर्ण योजनांची पूर्तता करण्यावर भर द्यावा, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले.



